Gatha Cognition®
Perception, Learning and Reasoning
प्रबोधनाचा अब्राह्मणी दृष्टीकोन
प्रबोधनाचा अब्राह्मणी दृष्टीकोन
शरद पाटील यांची मुलाखत

1.सदनिका नं. १५, कुंती हौसिंग सोसायटी, आर्यप्रस्थनगर, बदलापूर, जि. ठाणे, महाराष्ट्र.

पुणे
978-81-932622-4-5
dx.doi.org/10.21523/gcb8
Gatha Cognition Free Publication
Cross Referance

पुस्तकाबद्दल

भारतीय मार्क्सवादी विचारवंतांमधील दार्शनिक श्रेणीचे, तत्त्वज्ञ-विचारवंत असा लौकिक असलेले थोर प्राच्यविद्यापंडित, कॉम्रेड शरद् पाटील यांची ही मुलाखत पंचवीस वर्षांपूर्वीची आहे. इतकी जुनी मुलाखत आजही तितकीच प्रस्तुत असल्यानेच ती प्रसिद्ध होत आहे. शपांनी मुलाखत दिली ते साल होते १९९३. नुकतेच देशाने नवीन आर्थिक धोरण, ज्याला खुली अर्थव्यवस्था म्हणता येईल ती स्वीकारली होती. बाबरीपतनाचे महाभारतही पाठोपाठ घडून गेले होते. त्याआधीच्या दशकात देशाने इंदिरा व राजीव गांधींच्या हत्येतून आलेली राजकीय अस्थिरता अनुभवली होती. त्या सर्व घडामोडींवर शपांचे सत्यशोधक मार्क्सवादी’ मधून भाष्य येतच होते. राजीव गांधी मंत्रीमंडळातूनच विरोधाचा पण राजकीय शुद्धतेचा आग्रही सूर लावणाऱ्या व्ही. पी. सिंगांच्या बंडखोरीची शपांनी दखल घेतली होती. ‘व्ही. पी. सिंगांशी दोस्ती करून पर्यायी सत्ताकेंद्र उभारा!’ हे संपादकीय त्यांनी जून ८७च्या अंकात लिहिले होते. पुढे व्ही. पी. सिंगांच्या भोवती विरोधक एकवटले व त्यांच्या नेतृत्त्वाखाली केंद्रात सरकारही आले. संसदीय राजकारण, संसदबाह्य लढे, वैचारिक युद्धे, सामाजिक व आर्थिक घडामोडी अशी चौफेर नजर ठेवून त्यावर तातडीचे विश्लेषणात्मक भाष्य शपा करीत असत.

ही मुलाखत शपांचे निकटचे विश्वासू कार्यकर्ते व पत्रकार कॉ. गणेश निकुंभ यांनी शपांच्याच आग्रहावरून घेतलेली आहे. ही मुलाखत देण्यामागची शपांची तगमग व शपांच्या व्यक्तित्वाचा मनोज्ञ वेध घेणारे निकुंभांचे टीपणही सोबत आहेच. वाचकांना हे टीपण, मुलाखतीत व्यक्त झालेले शपा समजून घेण्यासाठी प्रत्यही मार्गदर्शक ठरेल.

सध्या देशात व राज्यातही संघ परिवाराचे सरकार आले आहे. या सरकारचे वर्तन आपण पाहतो आहोतच. असे सरकार सत्तेवर आल्यानंतर कसे वागेल, याविषयी शपांनी या मुलाखतीत केलेली भाकिते खरी ठरताहेत. या देशाचे मुख्य सांस्कृतिक विभाजन हे ‘ब्राह्मणी विरूद्ध अब्राह्मणी’ असेच आहे, ही बाब निक्षून सांगण्यात शपांनी आपली उभी हयात खर्च केली. त्याकडे सर्वच पुरोगाम्यांनी सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे. परिणामी, संघ व भाजपला खुले मैदान मिळवून देण्यात काँग्रेससोबत डाव्या पक्षांचाही हातभार कसा लागला ते शपा या मुलाखतीत उलगडून सांगतात. रामाच्या मिथकाचा सामना करण्यात दलित व डाव्यांची झालेली फसगत आणि सेक्युलर व कम्युनॅलिझम या आंग्ल शब्दांना भारतीय परिवेष देतांना पुरोगाम्यांनी केलेल्या गंभीर गफलतीवर शपा नेमकेपणाने बोट ठेवतात.

खरेतर ह्या शाब्दिक गफलती म्हणजे काँग्रेसने ब्राह्मणवादाशी केलेली तडजोड आहे, ज्याला एकेरी वर्गवादामुळे डावेही बळी पडले. ज्या संज्ञा संकल्पनांच्या शस्त्रांनी भारतीय ब्राह्मणी-भांडवली फॅसिझमचा परिवर्तनवादी शक्तींना मुकाबला करायचा आहे, त्या संज्ञांचेच ध्वनीतअर्थ असे विपर्यस्त व म्हणूनच बोथट झाल्यावर संघ भाजपच्या आक्रमणाला, ‘आक्रमण’ तरी कशासाठी म्हणायचे? असा रास्त सवाल शपांनी उभा केला आहे. आक्रमणासाठी लढाईच्या मैदानात प्रतिस्पर्धी तर हवा ना? भारतीय डावे व पुरोगामी आपल्या या इतिहासदत्त प्रतिस्पर्धी भूमिकेतूनच अंतर्धान पावले आहेत, असा शपांचा थेट निष्कर्ष आहे!

हा देश बुद्ध, महावीर व महात्मा गांधींचा...असा सतत जप करून भासविले जाते की हा देश अहिंसावादी देश आहे. पण इतिहास साक्षी आहे की, ब्राह्मणीसत्तेला आव्हान दिले की, कर्मठ शक्ती हिंसेवर उतरतातच. वर्णसंकराला पाठिंबा देतो म्हणून बळिराजाची हत्या झाली आहे, हे शपांचे मत आपल्याला महात्मा गांधी ते अलिकडील विचारवंतांच्या ताज्या हत्त्यांशी ताडून पाहता येते. जातिव्यवस्था घट्ट करू पाहणाच्या शक्ती मुस्लिमांसह दलित, आदिवासींचे दमन अहिंसक मार्गाने करतील असं मानण्याचे कारण नाही, हा शपांचा ९३साली या मुलाखतीत दिलेला इशारा आपल्याला खैरलांजी ते खर्डा या घटनांमधून व केंद्रात भाजपचे पूर्ण बहुमताचे सरकार आल्यावर तर त्याही पुढच्या रक्तरंजित घटनांमध्ये प्रत्ययास आलेला दिसतो.

ह्या मुलाखतीत शपांनी सर्व कळीच्या प्रश्नांना हात घातला आहे. त्याची कारणमीमांसा केली आहे व उत्तरासाठीचा मार्गही दाखविला आहे. शपांच्या अब्राह्मणी मांडणीला ब्राह्मणी छावणीने अनुल्लेखाने मारले, यात नवल काही नाही. पण शपा हे ‘अवघडदास’ आहेत, असा अपप्रचार करून कम्युनिस्ट पक्षांच्या डाव्या केडरलाही शपांपासून दूर ठेवण्याचे काम कम्युनिस्ट नेतृत्त्वाने देखील केले आहे. ही पुस्तिका वाचून डाव्या केडरसह सर्व परिवर्तनवादी तरुणाईला शपांचे साहित्य वाचण्याची प्रेरणा मिळाली तर या पुस्तिकेचा हेतू सफल झाला, असे मानता येईल.

----------------------

किशोर मांदळे, पुणे

Book Call For Book