Gatha Cognition®
Perception, Learning and Reasoning
भगवान बुद्ध
भगवान बुद्ध
Gatha Cognition.
978-81-932622-2-1
dx.doi.org/10.21523/gcb6
Gatha Cognition Free Publication
Cross Referance

पुस्तकाबद्दल

धर्मानंद कोसंबी यांचा ‘भगवान बुद्ध’ हा गोतम बुद्ध आणि त्याच्या धम्माच्या अभ्यासकांसाठी एक प्रमाण ग्रंथ आहे. सुविचार प्रकाशनाने १९४० साली हा ग्रंथ ‘नवभारत ग्रंथ मालिके’साठी प्रकाशित केलेला आहे. हा ग्रंथाचे अनेक भाषांमधून भाषांतर करण्यात आलेले आहे. साहित्य अकादमीने या ग्रंथाचा हिन्दी अनुवाद केलेला असून हा ग्रंथ २५०० व्या बुद्ध परीनिर्वाण जयंतीच्या दिवशी, २२ मे १९५६ रोजी भारताच्या राष्ट्रपतींना नजर करण्यात आलेला आहे.

१४ ऑक्टोबर १९५६ साली महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो अनुयायांसह बौद्ध धर्मात प्रवेश केला. त्यांनी बौद्ध द्धाम्माची दिक्षा घेतली. या प्रसंगी या ग्रंथाची प्रमाण ग्रंथ म्हणून प्रसिद्धी झाली. १९५७ साली या ग्रंथाची दुसरी आवृत्ती सुविचार प्रकाशानेच छपून प्रसिद्ध केली. पहिली आवृत्ती दोन भागात (पूर्वार्ध व उत्तरार्ध) प्रसिद्ध केलेली होती. १९७४ साली तिसरे मुद्रण करण्यात आलेले आहे. अलीकडे, २०१२ साली कौशल्य प्रकाशन, औरंगाबाद यांनी हा ग्रंथ पुन्हा छापून अभ्यासकांसाठी उपलब्ध केलेला आहे.

Online आवृत्तीच्या निमित्ताने

GATHA COGNITION  ने धर्मानंद कोसंबी यांचा ‘भगवान बुद्ध’ हा ग्रंथ माहितीच्या जाळ्यात उपलब्ध केलेला आहे. सर्व प्रकरणे स्वतंत्रपणे PDF व HTML स्वरुपात उपलब्ध केलेली आहेत. त्यामुळे वाचकांना हा ग्रंथ संगणक व मोबाईल च्या पटलावर (screen) वाचता येईल, त्यांची सुलभ प्रिंट सुद्धा घेता येईल. वाचकांसाठी ही एक सुविधा ठरेल अशी आशा वाटते.

मुखपृष्ठावरील चित्र कॉम्रेड सुभाषचंद्र सोनार यांनी उपलब्ध करून दिलेले आहे.

धर्मानंद कोसंबी

भगवान बद्धावरील श्री. धर्मानंद कोसम्बींचा ग्रंथ मिळवून नवभारत ग्रंथमालेने ग्रंथकारांच्या कीर्तिमत्तेच्या बाबतीत उच्चांक गाठला आहे. पालि भाषा व बौद्ध धर्म यांत निष्णात म्हणून त्यांचे नाव जगातील विद्वन्मंडळास परिचित आहे.

धर्मानंद कोसंबी यांचे पूर्वायुष्य हे आधुनिक काळात अत्यंत विरलत्वाने आढळणा-या धर्मजिज्ञासेचे सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे. केवळ तेवीस वर्षांच्या वयात पत्नीला सोडून व संसाराला लाथ मारून कल्याणकारक अशा धर्माचे ज्ञान करून घेण्याच्या तीव्र तळमळीने घराबाहेर पडलेल्या धर्मानंदाची हकीकत वाचली म्हणजे जगतातील दु:खाचा नाश करणा-या धर्ममार्गाच्या संशोधनार्थ गृहत्याग करणा-या गोतामाचे चित्र डोळयापुढे आल्याखेरीज राहत नाही. सांसारिक आपत्ति कुणावर येत नाहीत ? हजारो लाखो लोकांवर त्या येतात. त्या प्रसंगी मनुष्य ज्या त-हेने वागतो, त्यावरूनच त्याची किंमत ठरते. गोवे प्रांतात एका लहानशा गावी १८७६ साली जन्मलेल्या धर्मानंदावर तरुणपणी काही सांसारिक आपत्ति आल्या आणि त्याचे “चित्त प्रपंचात रमेनासे झाले.” “बुद्धावर माझी अधिकाधिक श्रद्धा जडत चालली. प्रपंचाचा जसजसा वीट येत गेला, तसतशी माझी श्रद्धा दृढ होत गेली. माझे सर्वस्व बुद्ध आहे असे वाटू लागले. कितीहि संकटे येवोत. कितीहि विपत्ति भोगाव्या लागोत, बुद्धोपदेशाचे ज्ञान मला झाले म्हणजे माझ्या जन्माचे साफल्य झाले असे मला वाटू लागले.” असे धर्मानंदांनीच त्या काळातल्या आपल्या मन:स्थितीचे वर्णन केले आहे.

प्रबल धर्मजिज्ञासेच्या पायी इ. स. १८९९ सालच्या अखेरीस निष्कांचन स्थितीत गृहत्याग केल्यानंतर या तरुणाने जे पर्यटन केले व ज्या अतर्क्य हालअपेष्टा सोसून बौद्धधर्माचे ज्ञान व त्याबरोबरच आत्मसमाधान संपादिले, त्यांचा वृत्तांत अतीव अद्भुत व विस्मयकारक आहे. धर्मज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी आरंभी संस्कृत शिकण्याचे धर्मानन्दांनी ठरविले. त्यासाठी प्रथम पुण्यास, तेथून ग्वालेरीस व तेथून काशीस त्यांनी गमन केले. संस्कृत विद्येच्या या माहेरघरात त्यांची अध्ययनाची सोय सहज व चांगल्या रीतीने लागली. जेवणाच्या सोयीसाठी मात्र अन्नछत्रच त्यांना पाहावे लागले; व तेथे प्रवेशही कष्टानेच मिळाला. सुमारे दीड वर्ष व्याकरण (कौमुदी) व साहित्य यांचे अध्ययन केल्यानंतर धर्मजिज्ञासेने धर्मानंदांना नेपाळात जाण्यास प्रवृत्त केले. बुद्ध भगवानाच्या धर्माचे जिवंत अवशेष, भगवंताची जन्मभूमि असण्याचा मान ज्या राज्यास मिळाला आहे, त्या नेपाळच्या राज्यात काही तरी पाहावयास मिळतील या आशेने नेपाळात गेलेल्या या आर्त व जिज्ञासु तरुणास तेथील विपरीत परिस्थिति पाहून अत्यंत विषण्णता प्राप्त झाली. तेथून ते बुद्धगयेला गेले. बौद्ध धर्मग्रंथांचे सम्यक् ज्ञान सिंहलद्वीपात गेल्याने होईल असे तेथील एका भिक्षूने सांगितल्यावरून धर्मानन्द तेथून तडक सिलोनास जाण्यास निघाले. अपरिमित त्रास, कष्ट व संकटे सोसून ते एकदाचे सिलोनास पोचले. तेथे त्यांस अखेर पाहिजे होते ते, म्हणजे धर्माचे ज्ञान मिळाले. कोलम्बो शहराजवळ असलेल्या ‘विद्योदय विद्यालय’ नावाच्या विहारात भिक्षुधर्माने राहून त्यांनी महास्थविर सुमंगलाचार्य यांच्या हाताखाली पालि ग्रंथांचा अभ्यास केला. परंतु सिलोनांत खाण्याची आबाळ होऊ लागल्यामुळे त्यांची प्रकृति नीट राहीना, म्हणून ते सुमारे एक वर्षाने परत फिरले व मद्रास येथे आले. तेथे सहा महिने राहून अधिक अध्ययन करण्याच्या उद्देशाने ब्रह्मदेशात गेले. तेथे विहारात राहून ध्यानमार्गाचा अभ्यास केला; परंतु तेथेहि प्रकृति चांगली न राहिल्यामुळे ते पुनः हिंदुस्थानात आले. भिक्षुवेषातच सारनाथ, कुसिनारा, लुम्बिनीवन, कपिलवस्तु इत्यादि भगवान गोतमाच्या आयुष्यातील चिरस्मरणीय घटनांनी पावन झालेल्या बौद्ध क्षेत्रांच्या यात्रा त्यांनी केल्या. नंतर पुन: ब्रह्मदेशात जाऊन मंदाले शहराजवळ निरनिराळया विहारांत राहून एक वर्षभर बौद्ध धर्भग्रंथांचा व ध्यानमार्गाचा अभ्यास केला व तेथून १९०६ च्या आरंभी हे धर्मानन्द भिक्षु पुनः कलकत्यास आले.

यानंतर कोसम्बींचा आयुष्यक्रम सार्वजनिक स्वरूपाचा झाला असल्यामुळे त्यात इतकी अद्भुतरम्यता व लोकविलक्षणता अनुभवास येत नाही. तथापि त्यांचे यापुढील सर्व आयुष्य स्वदेशसेवेच्या हेतून प्रेरित झालेले असल्यामुळे ते पूर्वीच्या आयुष्याइतकेच उद्बोधक व उदात्त भासते. स्वतः एवढ्या कष्टांनी मिळविलेल्या बौद्ध धर्माच्या (व पाली वाड्मयाच्या) ज्ञानाचा स्वदेशबांधवांमध्ये प्रचार करावयाचा या ध्येयाने यापुढील त्यांच्या क्रिया प्रेरित झालेल्या दिसतात. वंगभंगाच्या चळवळीतून निघालेल्या कलकत्याच्या नैशनल कॉलेजात व कलकत्ता युनिवर्सिटीत पालि भाषेच्या अध्यापकाची जागा त्यांनी पतकरली. परंतु कोसम्बींची विशेष इच्छा आपल्या महाराष्ट्र बांधवांमध्ये बौद्ध धर्माच्या ज्ञानाचा प्रसार करावा अशी होती. त्यांनी श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड यांची गाठ घेतली. त्या उदारधी नृपतीने थोड्याच अवकाशात तारेने पुढील संदेश पाठविला, “तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याहि शहरी राहत असाल तर तुम्हांला बडोदे सरकारातून दरमहा ५० रु. मिळतील व ही मदत तीन वर्षेपर्यंत चालू राहील. मात्र वर्षांतून एखादे पुस्तक बडोदे सरकारासाठी तुम्ही लिहून तयार केले पाहिजे.” बरीच भवति न भवति करून अखेर कोसम्बींनी गायकवाड सरकारचा हा आश्रय पत्करला. यासंबंधाने कोसंबी म्हणतात- “द. म. २५० रु. ची (कलकत्ता युनिवर्सिटीची) नोकरी सोडून श्रीमंत गायकवाड महाराजांनी दिलेल्या ५० रु. वेतनाचा स्वीकार केल्याबद्दल मला कधीहि पश्चाताप झाला नाही. हे वेतन स्वीकारले नसते तर डॉ. वुड्स यांची गाठ पडली नसती आणि अमेरिकेला जाण्याची संधि सापडली नसती. पुण्याला येऊन राहिल्यामुळे डॉ. भांडारकर यांचा निकट संबंध जडला व त्यांच्या प्रयत्नाने मुंबई युनिवर्सिटीत पालि भाषेचा प्रवेश करण्यात आला.”

डॉ. जेम्स एच. वुड्स हे अमेरिकेतील सुविख्यात हार्वर्ड युनिवर्सिटीचे प्रोफेसर होते. त्यांना पालि शिकविण्याच्या निमित्ताने कोसम्बींचा त्यांच्याशी परिचय झाला. परिचयाचे रूपांतर स्नेहात होऊन ‘विशुद्धिमार्ग’ नामक बौद्ध तत्वज्ञान ग्रंथाच्या संशोधनाच्या कामी मदत करण्याकरिता डॉ. वुड्सनी कोसम्बींना अमेरिकेत पाचारण केले. सयाजीराव महाराजांनी परवानगी घेऊन कोसम्बी यांनी १९१० च्या एप्रिल महिन्यात अमेरिकेस प्रयाण केले. हार्वर्डमधील संस्कृत प्रभुति पौरस्त्य भाषांचे प्रमुख आचार्य प्रा. ल्यानमन यांच्या सहकार्याने कोसम्बी यांचे काम सुरू झाले. कोसम्बींनी कसून काम करून ‘विशुद्धिमार्गा’चे संशोधन १९११ च्या अखेरपर्यंत संपविले. परंतु ल्यानमनशी त्यांचे पटेना. कोसम्बींचे प्रयत्न गौण लेखून झालेले सर्व संशोधन आपल्याच नावे प्रसिद्ध व्हावे असा ल्यानमन यांचा मानस दिसला व तो आपला बेत साधत नाही असे दिसताच ते चिडले व संतापले. तेव्हा कोसाम्बींनी अमेरिकेहून परत फिरण्याचा निश्चय केला व ते जानेवारी १९१२ मध्ये न्यूयॉर्कहून स्वदेशी यावयास निघाले.

हिंदुस्थानात आल्यानंतर प्रा. कोसम्बींनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या चालकांच्या निमंत्रणावरून फर्गसन कॉलेजात पाच वर्षांच्या कराराने पालि भाषेच्या प्राध्यापकाची नोकरी पतकरली. त्यांच्या अध्यापकत्वाच्या कारकीर्दीत बौद्धधर्माचे व पालिभाषेचे पुष्कळ विद्वान त्यांच्या हातून तयार झाले. कै. चिंतामण वैजनाथ राजवाडे, डॉ. पु. वि. बापट (फर्गसन कॉलेजातील पालीचे प्राध्यापक), प्रा. चिंतामणराव जोशी (बडोदा कॉलेजातील पालीचे प्राध्यापक), प्रा. ना. के. भागवत (सेंट झेविअर कॉलेज, मुंबई, येथील पालीचे प्राध्यापक) ही सर्व कोसम्बींच्याच शिष्यमालिकेतील चमकदार रत्ने होत.

सहा वर्षे फर्गसन कॉलेजात प्राध्यापकाचे काम केल्यानंतर डॉ. वुड्स यांनी अमेरिकेत येण्याबद्दल फार आग्रह केल्यावरून ते १९१८ साली पुनः अमेरिकेत गेले. त्या वेळी महायुद्ध सुरू असल्यामुळे अमेरिकेचा हा प्रवास कोसाम्बींनी पूर्वेकडून पॅसिफिक महासागरातून केला. त्यांजबरोबर त्यांची मुले व श्री. पार्वतीबाई आठवले या होत्या. या खेपेस अमेरिकेत कोसम्बींचा मुक्काम सुमारे ४ वर्षे झाला. १९२२ च्या ऑगस्टमध्ये ते परत आले. त्यांनी तेथे संशोधनकार्य बरेच केले, परंतु ल्यानमनच्या दुराग्रहामुळे त्यांना या खेपेसहि त्रास झालाच.

कोसंबींच्या विचारांना नवी दिशा १९११ सालच्या अमेरिकेच्या पहिल्या सफारी पासूनच लागत चालली होती. अमेरिकेत त्यांनी समाजशास्त्रावरील ग्रंथांचे--विशेषत: समाजसत्तावादाचे-- खूप वाचन केले. भांडवलशाही नष्ट करून समाजाची रचना साम्यवादाच्या पायावर केल्यानेच सामान्य जनतेला सुख मिळेल व समाजातील स्पर्धा, कलही इत्यादिकांचे मूळ नाहीसे होईल, अशी त्यांची खात्री होत चालली होती. परंतु पाश्चात्य देशात साम्यवाद मूळ धरू शकत नव्हता व सर्व राष्ट्रांचे हात हिंसा व अत्याचार यांनी बरबटलेले होते, हे त्यांस सहन होत नव्हते. “जगांतील श्रमजीवी वर्गाने अशा प्रकारचा प्रेमाचा मार्ग स्वीकारल्याशिवाय मनुष्यकृत मनुष्यहत्या बंद होणार नाही, परतु देशाभिमानाने उन्मत्त झालेल्यांना तो सापडणार कसा ?”

अशा मनःस्थितीत भांडवलशाहीचे आगर बनलेल्या अमेरिकेत अस्वस्थ चित्ताने कालक्रमणा करीत असता १९२०-२१ सालच्या गांधीजींनी सुरू केलेल्या सत्याग्रहाच्या बातम्या तेथे एकामागून एक येऊन पोचू लागल्या. त्या वाचून कोसम्बींचे अंतःकरण धन्यतेने भरून गेले. “राष्ट्रद्वेषाच्या आणि वर्णद्वेषाच्या रोगातून पार पडण्याला याच्याशिवाय दुसरा मार्ग कोणताही असू शकत नाही,” असा त्यांचा ठाम ग्रह झाला.

अशा रीतीने कोसम्बी अमेरिकेहून आले ते मनाने साम्यवादी, सत्याग्रहाचे पुरस्कर्ते बनून आले. हिंदुस्थानात आल्यावर १९२२ ते १९२५ पर्यन्त गांधीजींनी काढलेल्या गुजरात विद्यापीठाच्या पुरातत्त्वमंदिर शाखेत पालिभाषाचार्य या नात्याने त्यांनी काम केले. या अवकाशात मराठीत व गुजरातीत त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. प्रा. ल्यानमन सेवानिवृत्तू झाल्यामुळे ‘विसुद्धिमग्गा'चे संस्करण पूर्ण करण्याची संधि आता मिळेल या अपेक्षेने १९२६ च्या प्रारंभास धर्मानन्द पुनः अमेरिकेस गेले व सप्टेंबर १९२७ पर्यंत सर्व संस्करण छापून तयार झाल्यानंतर ते स्वदेशी परतले.

हिंदुस्थानात आल्यानंतर पत्नीला घेऊन त्यांनी सर्व क्षेत्रांच्या यात्रा केल्या व गुजरात विद्यापीठात ते पूर्वीप्रमाणे राहू लागले. १९२९ साली लेनिनग्राड (रशिया) येथील बैद्ध संस्कृतीच्या अभ्यासासाठी स्थापिलेल्या संस्थेत काम करण्यास ते रशियात गेले. रशियातील अनुभवांचा त्यांच्या अगोदरच साम्यवादी बनलेल्या मनावर बराच अनुकूल परिणाम झाला. रशियातील हवा, राहणी व अन्न न मानवल्यामुळे ते एका वर्षांच्या आतच, म्हणजे १९३० च्या प्रारंभी हिंदुस्थानास परत आले, येथे आले तो सर्व देश सत्याग्रहयुद्धासाठी सज्ज झालेला त्यांस दिसला. मार्चमध्ये सुप्रसिद्ध दांडीकूच झाले. धर्मानंदांनी या स्वातंत्र्ययुद्धात उडी घेतली. खेड्यापाड्यातून प्रचार केला, शिरोडे (रत्नागिरी), येथील मिठाच्या सत्याग्रहात भाग घेतला व अखेर विलेपार्ले येथील सत्याग्रह-छावणीचे प्रमुखत्व स्वीकारले येथे त्यांना पकडल्यानंतर लवकरच हायकोर्टाने सोडून दिले. ऑक्टोबर १९३१ मध्ये ते डॉ. वुड्सच्या आग्रहावरून चवथ्यांदा अमेरिकेस गेले व तेथून १९३२ साली परत आहे. त्यानंतर “१९३४ सालच्या ऑगस्ट महिन्यात मी बनारसला जाऊन राहिलो. तेथे सहा महिने हिंदु युनिवर्सितीचा पाहुणा होतो. त्यानंतर काशी विद्यापीठात आठ नऊ महिने राहिलो. विद्यापीठाच्या चालकांनी माझ्यासाठी एक लहानसे घर बांधून दिले. त्या घरात राहून मी ‘हिंदी संस्कृति आणि अहिंसा’ हे पुस्तक लिहिले.”

श्रष्मजीवी वर्गामध्ये बुद्धाच्या अहिंसा तत्वज्ञानाच्या प्रचाराने स्पृश्यस्पृश्य भेद नष्ट करून समता स्थापता येईल की काय हे पाहण्याच्या हेतूने परळच्या वस्तीत एक आश्रम स्थापन करण्याचे कार्य कोसम्बींनी यानंतर हाती घेतले. त्यांच्या हेतूनुसार १९३७ च्या जानेवारीत ‘बहुजनविहारा’ची स्थापना झाली. तेथे आपल्या उद्देशानुसार ते कार्य करू लागले.

तेथे राहून आपले उद्देश सिद्धीस जाणार नाहीत असे काही वर्षांच्या अनुभवानंतर त्यांच्या मनाने घेतले तेव्हा ते बनारसजवळ सारनाथ येथे जाऊन राहिले. आयुष्याच्या या अखेरीस जैन तीर्थकर पाश्र्वनाथप्रणीत ‘चतुर्यामधर्मा’ने त्यांचे मन विशेष आकृष्ट केले होते. त्यावर त्यांनी एक लहानसे पुस्तकहि लिहिले.

जैन धर्माच्या उपदेशानुसार त्यांच्या मनाने घेतले की शरीर दुर्बळ होऊन लोकांच्या सेवेसाठी त्याचा उपयोग होत नाहीसा झाल्यानंतर त्याला अन्न घालून त्याचे रक्षण करणे हे पाप होय. प्रायोप्रवेशन करून शरीरत्याग करणे हाच अशा स्थितीत धर्म होय, असे मानून त्यांनी अन्नत्यागास सुरवातहि केली. महात्मा गांधीजींना हे कळले तेव्हा त्यांनी कोसाम्बींना या त्यांच्या बेतापासून परावृत्त केले. तथापि पार्थिव देहाचे आवरण त्यांच्या आत्म्याला तेव्हापासून मानवेनासे झाले. अखेर गांधीजींच्या सन्निध असावे म्हणून ते सेवाग्राम येथे जाऊन राहिले व तेथे ता. ५ जून १९४७ रोजी त्यांचा देहान्त झाला.

याप्रमाणे या महाभागाचे लोकविलक्षण चरित्र आहे. बुद्ध भगवानाने उपदेशिलेला कल्याणकारक धर्ममार्ग त्यांना पटला. त्यांनी तो स्वत: आचरून सर्वांस उपदेशिला. पण त्यांचे मन, इथेच थांबले नाही. ते अखेरपर्यंत नवेनवे संस्कार ग्रहण करीत विकसित होत होते. मात्र हे संस्कार परस्परांशी सुसंगत असे असून एकाच मार्गावरील टप्पे असावेत तसे होते. अमेरिकेत गेल्यावर समाजशास्त्राचा अभ्यास घडून मार्क्सप्रणीत समाजवादाचे ग्रहण त्यांच्या मनाने केले. पण गांधीजींच्या समग्रजीवनव्यापी अहिंसेचे आणि सत्याग्रहाचे दर्शन जेव्हा त्यांना घडले तेव्हा खराखुरा समाजवाद, सत्य अहिंसा यांच्या मार्गानेच मानवसमाजात अवतरू शकेल अशी त्यांची दृढ धारणा झाली. त्यात अखेरीस जैनांच्या ‘चतुर्याममार्गा’च्या व्यासंगाची भर पडून वैयक्तिक जीवनाची कृतार्थता हेच परमध्येय, समाजवादाचे पर्यवसानहि त्यात झाले पाहिजे, अशी त्यांची समुच्चयात्मक जीवनदृष्टि बनली. स्वत:ला जे जे प्रतीत झाले त्याचा त्यांनी निर्भयतेने प्रचार केला.

फेब्रुवारी १९१० मध्ये सयाजीराव महाराजांच्या सांगण्यावरून बडोदे येथे बौद्ध धर्मावर कोसम्बींनी व्याख्याने दिली. त्यांचे पुस्तक लगेच ‘बुद्ध, धर्म आणि संघ’ या नावाने प्रसिद्ध करण्यात आले. पुढे १९१४ साली त्यांचे ‘बुद्धलीलासारसंग्रह’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले. या ग्रंथाचे तीन भाग असून गोतम हा बुद्ध होण्याच्या पूर्वीच्या जन्मातील काही कथा पहिल्या भागात, खुद्द गोतम बुद्धाच्या कथा दुस-या भागात व बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण वर्णन करणा-या कथा तिस-या भागात दिलेल्या आहेत. ‘समाधिमार्ग’ (१९२५) व ‘बौद्धसंघाचा परिचय’ (१९२६) ही पुस्तके गुजरात विद्यापीठात त्यांनी असताना लिहिली. त्यानंतर ‘हिंदी संस्कृति आणि अहिंसा’ (१९३५) हे पुस्तक काशी येथे असताना लिहिले. यात त्यांनी प्राचीन भारतासंबंधीचे आपले परिणतावस्थेतील विचार व आपले सामाजिक तत्त्वज्ञान प्रकट केले आहे. ‘विसुद्धिमग्गा’च्या संशोधनासंबंधी वर अनेकवार उल्लेख केलाच आहे. या ग्रंथाचे संस्करण अंधेरी (मुंबई) येथील ‘भारतीय विद्याभवन’ या संस्थेने नागरी लिपीत नुकतेच प्रसिद्ध केले आहे. गुजराती भाषेतहि त्यांची कित्येक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.

गांधीजींच्या प्रेरणेने धर्मानन्दांच्या स्मारकाची योजना करण्यात आली. तदनुसार बौद्ध धर्म आणि साहित्य यांचे श्रद्धापूर्ण अध्ययन करण्याकरिता काही विद्यार्थी लंकेमध्ये पाठविण्यात यावेत असे ठरले. शिवाय धर्मानन्दांच्या वाङ्मयाचे सर्व भारतीय भाषांमधून प्रकाशन व्हावे असाहि संकल्प झाला.

धर्मानन्दजींनी आपल्या पूर्वायुष्याचा वृत्तान्त लिहिला, तो ‘निवेदन’ या नावाने पुस्तकरूपाने १९२४ साली प्रसिद्ध झाला. उत्तर आयुष्याचा वृत्तान्त त्यांनी १९३७-३८ साली ‘खुलासा’ या नावाने लिहिला, तो वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाला होता.

निर्लोभता, निर्भयता, आणि ध्येयशीलता या तीन अमोल गुणांनी कोसम्बींचे चरित्र्य संपन्न होते. बौद्ध धर्म, तत्त्वज्ञान आणि साहित्य यांचे ते नुसते पंडित नव्हते; ते पंडितांचे पंडित होते. त्यांनी आपल्या पांडित्याचा बहुजनहिताय, बहुजनसुखाय वेच केला हे त्यांचे वैशिष्टय. या वैशिष्टयामुळे पंडितांमध्ये, तसेच लोकसेवकांमध्ये त्यांचे उच्चस्थान अढळ आहे.

*****

 

Book Call For Book